Site icon Marathi Sprouts News

भाजपच्या माजी आमदाराने केला हजारो कोटी रुपयांचा FSI महाघोटाळा

भाजपच्या माजी आमदाराने केला हजारो कोटी रुपयांचा SFI महाघोटाळा

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

पेशाने बिल्डर असणाऱ्या भाजपच्या घोटाळेबाज माजी आमदाराने एफएसआयचा महाघोटाळा केलेला आहे व त्याआधारे कोट्यवधी रुपयांचा मलिदा गोळा केला आहे, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’ने माहितीच्या अधिकारातून मिळवलेली आहे. ज्येष्ठ पत्रकार उन्मेष गुजराथी यांनी या महाघोटाळ्यावर लिहिलेला हा स्पेशल रिपोर्ट.

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व बिल्डर पराग शाह यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या मर्जीतील भाडेकरूंना एकत्रित केले व त्यांची असोसिएशन बनवली. ही असोसिएशन तयार करताना त्यांनी उर्वरित भाडेकरूंना पुसटशी कल्पनादेखील दिलेली नाही. अशा नियमबाह्य पद्धतीने बनवलेल्या असोसिएशनच्या मदतीने शाह यांच्या कंपनीने ५ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा महाघोटाळा केलेला आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’ या मुंबईतील नामांकीत इंग्रजी वर्तमानपत्राच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने (एसआयटी) ‘माहिती अधिकारा’अंतर्गत मिळवलेली आहे.

मुंबईतील घाटकोपर या उपनगरात पंतनगर हा भाग आहे. या पंतनगरमध्ये नायडू कॉलनी आहे. या कॉलनीत म्हाडाने १४ इमारती बांधलेल्या होत्या. त्यामध्ये जवळपास ४४८ घरे होती. या घरांच्या पुनर्विकासाची जबाबदारी MAN INFRACONSTRUCTION LIMITED (MICL) या कंपनीने स्वीकारलेली आहे. पराग किशोरचंद्र शाह हे या कंपनीचे मुख्य संचालक व घाटकोपर पूर्वमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत.

असा केला एफएसआय(FSI ) महाघोटाळा?

‘स्प्राऊट्स’ला मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डर शाह यांनी या इमारतींमधील ४४८ सदस्यांना कधीच विश्वासात घेतले नाही. त्यांनी फक्त स्वतःच्या मर्जीतील सदस्यांना पदाधिकारी बनवले व त्याच पदाधिकाऱ्यांच्या नावाने Ghatkopar Avenue Aradhya १० या नावाने सोसायटी बनवली. या कथित सोसायटीच्या नावाने प्रोजेक्ट बनविण्यात आला. या प्रोजेक्टच्या आधारावर म्हाडाकडे ‘एफएसआय’साठी (फ्लोअर स्पेस इंडेक्स – चटईक्षेत्र निर्देशांक) अर्ज करण्यात आला. हा अर्ज म्हाडाने त्वरित मंजूर केला व भाडेकरूंना ३ चा FSI देण्यात आला. इतकेच नव्हे तर त्याला पार्टली भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपेशन सर्टिफिकेट ) देण्यात आले.

म्हाडाने नियमाप्रमाणे ३ चा FSI मंजूर केला होता, मात्र बिल्डर शाह यांनी केवळ २ चा एफएसआय दिला, म्हणजेच प्रत्येक घरामागे १ चा भ्रष्टाचार केला. शाह यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या मर्जीतील असोसिएशनचे पदाधिकारीही संतापले व त्यांनी असोसिएशनच्या नावाने म्हाडा व संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यावर म्हाडाने अद्याप कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई केलेली नाही, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’कडे उपलब्ध आहे.

या सर्व सोसायटीमध्ये एकूण ४४८ घरे आहेत. म्हणजेच घरटी १ असा ४४८ चा FSI चा हा महाघोटाळा आहे. हा ४४८ चा FSI हा शाह यांनी कमर्शिअल व सेलेबल गाळे व घरांसाठी वापरला. आजमितीला घाटकोपरच्या जवळपास पंतनगरमध्ये १ एफएसआयची किंमत ही साधारण: २५ लाख रुपयांच्या जवळपास आहे. अशा एकूण ४४८ एफएसआयची किंमत ही जवळपास ६५० कोटी रुपयांहून अधिक होते. म्हणजेच हा ६५० कोटी रुपयांचा महाघोटाळा पराग शाह या बिल्डरने केलेला आढळून येतो, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’ला पुराव्यासह मिळालेली आहे.

अधिक वाचा  : – दादासाहेब फाळके नावाने नकली पुरस्कार सोहळ्यात बोगस पीएचडी वाटप

बिल्डर शाह यांच्यावर रहिवाशी नाराज

या १४ इमारतींची एकूण जागा ही १३ हजार स्केवर फूट होती. या जागेत शाह यांनी मूळ रहिवाशांसाठी केवळ ५ टॉवर ( फक्त २ हजार स्केवर फूट ) उभे केले, व इतर ११ हजार स्केवर फूट जागा ही कमर्शिअल व सेलेबल लोकांना विकण्यात आली. इतकेच नव्हे तर या नव्या लोकांना १० हजार स्क्वेअर फूट मोकळी जागा दिली. त्यामध्ये फक्त जैन मंदिर व स्विमिंग पूल अशी उच्च प्रतीची सुविधा आहे. याउलट संपूर्ण सोसायटीच्या कचऱ्याची मशीन (HTP ), अग्निशामक दलाची अवजड उपकरणे, जनरेटर, सोलर, पाण्याची टाकी, गटार, नाले या बाबी मूळ रहिवाशांच्या ५ टॉवरमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशी बिल्डर शाह यांना दररोज शिव्यांची लाखोली वाहत आहेत.

कोरोनाकाळात मिटिंग घेतल्याची नोंद

२० जुलै २०१९ रोजी कथितरित्या असोसिएशन बनवण्यात आली. त्यावेळी कोरोनाचा कहर होता. सरकारी नियमानुसार लोकांना एकत्रित यायला बंदी होती. त्याचवेळी सोसायटी बनविण्यासाठी मिटिंग झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. वास्तविक ही मिटिंग झालेलीच नव्हती व याहून महत्त्वाचे म्हणजे सरकारी नियमानुसार अशी प्रकारची मिटिंग घेणेही बेकायदेशीर होते, अशी माहितीही ‘स्प्राऊट्स’ला मिळालेली आहे.

मर्जीतील १४ पदाधिकाऱ्यांचीही शाह यांनी केली फसवणूक

घोटाळेबाज बिल्डर शाह यांनी स्वतःच्या मर्जीतील १४ बिल्डिंगसाठी फक्त १४ भाडेकरूंनाच निवडले होते. हे केवळ १४ भाडेकरू ४४८ भाडेकरूंचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, असा आरोपही सोसायटीच्या इतर भाडेकरूंनी केलेला आहे. हे १४ कथित पदाधिकारीही काही वर्षांनी बिल्डर शाह यांच्यावर नाराज झाले व त्यांनी म्हाडाकडे १५ ऑक्टोबर २०२३ रोजी तक्रार केली. या तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की बिल्डर पराग शाह यांनी कोऱ्या लेटरहेडवर सह्या घेतल्या व नंतर या सह्यांचा दुरुपयोग करण्यात आला. याच कथित पदाधिकाऱ्यांनी त्यासंबंधी ४ स्मरणपत्रेही म्हाडाला पाठवली. मात्र म्हाडाकडून त्यांना अद्याप कोणत्याही स्वरूपाचे उत्तर मिळलेले नाही.

नियमबाह्य पद्धतीने बनवली असोसिएशन

• या विभागात एकूण १४ सोसायट्या होत्या. प्रत्येक सोसायटीने त्यांच्या Special General Body Meeting (SGM) मध्ये रिझोल्युशन सबमिट केले. या रिझोल्युशनवर केवळ अध्यक्ष व सचिव यांच्याच सह्या आहेत. बाकीच्या कथित पदाधिकारी व सभासदांच्या संख्याही नाहीत. इतकेच नव्हे तर ही १४ रिझोल्युशन्स ‘कॉपी पेस्ट’ स्वरूपात सेम टू सेम बनविण्यात आलेली आहेत, अशी माहिती स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला माहिती अधिकार कायद्याअंर्गत मिळालेली आहे.

• वास्तवात SGM झालेलीच नव्हती, याशिवाय सोसायटीच्या मिनिट्समध्ये त्याचा ठराव तर सोडा पण साधा उल्लेखही झालेला नाही. मात्र या सर्व SGM ची चक्क खोटी कागदपत्रे बनविण्यात आली. व त्याच याआधारे म्हाडाच्या उपनिबंधकांकडून कथितरित्या असोसिएशन बनविण्यात आली.

घोटाळेबाज बिल्डर शाह यांच्यावर कारवाईची मागणी

या १४ सोसायटीजपैकी बहुतेक सोसायटींचे डेव्हलपमेंट अग्रीमेंट हे २००९ ते २०१२ पर्यंत करण्यात आलेले होते. हे करताना त्यांना २ चा FSI देण्याचे कबूल करण्यात आलेले होते. मात्र २०१२ नंतर ज्या सोसायटीजनी रजिस्ट्रेशन केले, त्यांना २.७ चा FSI लेखी ठरविण्यात आला. या १४ सोसायटीजना ११, ५१७, ३७ स्क्वेअर मीटरचा एरिया होता. त्यावेळी २ चा FSI होता. म्हणजेच २३,०३४.७४ स्क्वेअर मीटर बांधकाम करायला परवानगी होती. १२ जानेवारी २०१२ रोजी मुंबई महानगर पालिकेने सर्क्युलर काढलेले होते. या सर्क्युलरनुसार ०.३५ FSI हा भाडेकरूंना मोफत मिळणार होता व प्रिमिअम चार्जेस भरून बिल्डरला ०.३५ चा FSI सेलेबल मिळणार होता, मात्र असोसिएशनच्या नावाने बिल्डरने हाच FSI असोसिएशनच्या नावाने पदरात पाडून घेतला.

बिल्डर शहा यांनी घेतला क्लस्टर डेव्हलपमेंटचाही फायदा

फेक असोसिएशन बनविल्यानंतर घोटाळेबाज बिल्डर पराग शाह यांनी योजना बदलली. स्वतंत्ररित्या (indiual) प्लॉट विकसित करण्यापेक्षा त्यांनी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’मध्ये ही योजना रूपांतरित केली. या योजनेमध्ये त्यांना ६. चा FSI म्हाडाने दिला. याशिवाय यामध्ये १५०० स्क्वेअर मीटर एरिया कमर्शिअल म्हणून बांधायला परवानगी मिळाली.

अंतर्गत रस्त्यावरही नियमबाह्य बांधकाम

म्हाडाने दिलेल्या ६.९ चा FSI वापरण्यासाठी घोटाळेबाज बिल्डर शाहने चक्क १९०० स्क्वेअर मीटर अंतर्गत रस्त्यालाही समाविष्ट केले. यासाठी असोसिएशनचे लेटरहेड वापरण्यात आले, व त्याचा थेट फायदा बिल्डर शाह उपभोगत आहेत. या नियमबाह्य कृतीची तक्रारही म्हाडाकडे करण्यात आलेली आहे. मात्र म्हाडाचे या शाह बिल्डरशी आर्थिक संबंध असल्यामुळे म्हाडा अदयाप मौन बाळगून आहे, असा आरोप या रहिवाशांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केली.

शाह यांच्यावर ‘म्हाडा’ही मेहरबान

मुंबईमध्ये पुनर्विकास करताना सर्वसाधारणपणे २.७ चा FSI मिळतो. मात्र बिल्डर शाह यांच्यावर ‘म्हाडा’ (MHADA) विशेष मेहरबान आहे. त्यांना ६.९ चा FSI देण्यात आलेला आहे. त्यामुळे भूकंप, पूर, वादळ अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये इमारतींना काही धोका निर्माण झाल्यास परत पुनर्विकास करणे अशक्य आहे, अशी भीतीही भाडेकरूंना ‘स्प्राऊट्स’शी बोलताना व्यक्त केली. याबाबत प्रतिक्रियेसाठी शाह यांना संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

कोण आहेत पराग शाह ?

• पराग किशोरचंद्र शाह हे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते मुंबईमधील घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्याआधीही ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते, मुंबई महानगरपालिकेतील सर्वांत श्रीमंत उमेदवार अशी त्यांची ओळख होती, सध्या ते भाजपच्या तिकिटावर विधानसभेची निवडणुकीत उभे आहेत.

• सन २०१९ मध्ये घाटकोपर पूर्व मतदारसंघातून सलग ६ वेळेला निवडून आलेल्या प्रकाश मेहता या लोकप्रिय नेत्याचे अचानक तिकीट कापण्यात आले. मेहता यांच्याऐवजी पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आले, त्यावेळी ते प्रथमच चर्चेत आले. व्यवसायाने ते बिल्डर आहेत. MAN INFRACONSTRUCTION LIMITED (MICL) ही त्यांची स्वतःची कंपनी आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी पत्रकारांची तुलना ‘HMV’ म्हणजेच कुत्र्याशी केल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले होते, त्यानंतर त्यांनी सर्व पत्रकारांची जाहीर माफीही मागितली.

Exit mobile version