• ‘मिश्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’चा रामधारी मिश्रा ‘नॉट रिचेबल’
अमित पवार
काँग्रेस पक्षाचा कथित वरिष्ठ पदाधिकारी शिवजी प्रभुनारायण सिंग याने कित्येक सर्वसामान्य घरखरेदीदारांना कोट्यवधी(Looting of Crores) रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. शिवजी सिंग आणि ‘मिश्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’चे रामधारी देवनारायण मिश्रा यांनी संगनमताने घर खरेदीदारांना भूलथापा देत सदनिकांची खरेदी करण्यास भाग पाडले. आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले.
या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिवजी सिंग, त्याचा मेव्हणा प्रदीप सिंग आणि रामधारी मिश्रा यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. भारतीय दंड विधान ४२०, ४०६ आणि ३४ या कलमांतर्गत या ठगांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २ मे, २०२३ रोजी धनादेश न वठल्याप्रकरणी कलम १३८ (Negotiable Instrument Act) अंतर्गत रामधारी मिश्रा यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. मात्र, मिश्रा वैद्यकीय कारण सांगत न्यायालयात हजर राहत नसून त्यांचा थांगपत्ता लागत नाही.
शिवजी सिंग, रामधारी मिश्रा यांनी हीच मोडस ऑपरेंडी वापरून जयराम चावला यांच्याकडूनही तब्बल ७० लाख रुपये उकळले. २००८ साली रामधारी मिश्रा यांनी जयराम चावला यांच्यासोबत ‘मेमोरेंडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग’ केले. जयराम चावला यांना ‘राम दर्शन II’ या प्रस्तावित इमारतीत ३००० चौरस फुटांची सदनिका देणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. १८ महिन्यांत या सदनिकेचा ताबा मिळेल असेही त्यात स्पष्टपणे म्हंटले आहे. मात्र त्यांनाही अद्याप सदनिकेचा ताबा देण्यात आलेला नाही.
अधिक वाचा : – MOFSL Scandle
शिवजी सिंग, प्रदीप सिंग आणि रामधारी मिश्रा या त्रिकुटाने जयराम चावला आणि राघवेंद्र कुमार राय यांना ‘राम दर्शन II’ या प्रस्तावित इमारतीत सदनिका खरेदी करण्यास भाग पाडले. यांसारख्या कित्येक घरखरेदीदारांना खोटी आश्वासने देऊन त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. अनेक राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रं दाखवून काँग्रेस पक्षात आपला राजकीय दबदबा असल्याचे शिवजी सिंग घरखरेदीदारांना भासवत होता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपला प्रभाव असल्याचे चित्रं त्याने निर्माण केले होते. आपल्या ओळखीचा गैरफायदा घेत नातेवाईकांना, आप्तस्वकीयांना भूलथापा देऊन जाळ्यात अडकवायचे आणि सदनिका विक्रीचा बेकायदीशीर व्यवहार करायचा, ही शिवाजी सिंग, प्रदीप सिंग आणि रामधारी मिश्रा यांची मोडस ऑपरेंडी बनली आहे.
शिवजी सिंग, रामधारी मिश्रा यांनी हीच मोडस ऑपरेंडी वापरून राघवेंद्र कुमार यांच्याकडूनही तब्बल ६० लाख रुपये उकळले. शिवजी सिंग यांचा मेव्हणा प्रदीप सिंग याने राघवेंद्र कुमार यांना ऑगस्ट, २०१५ मध्ये वाकोला येथील मोकळ्या भूखंडावर ‘मिश्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ ७ आणि ९ मजल्याच्या दोन इमारती बांधणार असल्याचे सांगितले. आपले भावोजी शिवजी सिंग यांनी देखील ‘राम दर्शन II’ या प्रस्तावित इमारतीत दोन सदनिकांची नोंदणी केल्याचे त्याने सांगितले. आणि राघवेंद्र कुमार राय यांना शिवजी सिंग याच्या सांताक्रूझ येथील नजमा हेपतुल्ला हॉल या कार्यालयात घेऊन गेला.
या ठिकाणी शिवजी सिंग याने राघवेंद्र कुमार यांना ‘७ ते ८ महिन्यांत तुम्हाला तुमच्या सदनिकेचा ताबा मिळेल याची हमी मी घेतो’, अशा भूलथापा दिल्या. आणि त्यांच्याकडून अलाहाबाद बँकेचे २५ लाख रुपयांचे दोन धनादेश (क्रमांक ९२३७३९ आणि ९२३७४०) घेतले. त्याची पावती रामधारी मिश्रा यांनी राघवेंद्र कुमार यांना दिली. त्यानंतर जानेवारी ते जून, २०१६ या कालावधीत कायदेशीर कागदपत्रे आणि पार्किंगच्या नावाखाली ८ लाख रुपये रोख रक्कम प्रदीप सिंग याने घेतले. त्यानंतर ९ ऑगस्ट, २०१८ मध्ये पुन्हा २ लाख रुपयांचा अलाहाबाद बँकेचा धनादेश (०६८०९३) शिवाजी सिंग यांना दिला. या व्यवहाराची कोणतीही रीतसर कायदेशीर कागदपत्रं तयार करून दिली नाहीत. मात्र अद्यापही रामधारी मिश्रा यांनी राघवेंद्र कुमार राय यांना सदनिकेचा ताबा दिलेला नाही.
रामधारी मिश्राकडून सदनिकांची बेकायदेशीररीत्या विक्री
रामधारी मिश्रा याला प्रस्तावित इमारतीतील सदनिकांची विक्री करण्याचा अधिकार नसतानाही त्याने बेकायदेशीररीत्या सदनिकांची विक्री करीत सर्वसामान्यांची फसवणूक केली. २०१७ मध्ये ‘सनराईज कन्स्ट्रक्शन लिमिटेड’ आणि रामधारी मिश्रा या दोघांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात संमती करार करण्यात आला होता.
वाकोला येथील भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित इमारतींमधील सदनिकांची विक्री करण्याचा अधिकार केवळ ‘सनराईज कन्स्ट्रक्शन लिमिटेड’ला असेल, असे स्पष्टपणे त्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात सादर केलेला संमती करार धाब्यावर बसवून रामधारी मिश्रा याने आमची आयुष्यभराची जमापुंजी लुबाडली आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे.
• राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे पीडितांची धाव
रामनारायण मिश्रा याच्या फसवणुकीविरोधात अनिलकुमार दुबे, दिलीप गाडा आणि जावेद शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. मिश्रा याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ४२०, ३८०, ४५४, ४५७, ३४१, ५०६ अशा विविध कलमांतर्गत वाकोला आणि मालाड पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल नोंदविण्यात आले आहेत.