Site icon Marathi Sprouts News

Illegal: मुलुंडमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट

Mulund मुलुंडमध्ये अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट

Mulund मुलुंडमध्ये अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट

उन्मेष गुजराथी
Sprouts News Exclusive

• बिल्डर व पालिकेच्या अधिकाऱ्यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध

• शेकडो रहिवाशांची फसवणूक

मुलुंडमध्ये सध्या अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झालेला आहे. नियम धाब्यावर बसवून ही बांधकामे सुरु आहेत. या माध्यमातून बिल्डर व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी हे कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा करीत आहेत, मात्र यातून शेकडो रहिवाशांची व गाळेधारकांची फसवणूक होत आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स न्यूज’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.

मुलुंडमध्ये भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट (Occupation Certificate) नसलेली, नियम धाब्यावर बसवलेली अनधिकृत बांधकामे धूमधडाक्यात सुरु आहेत. विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या मुलुंडचे (पूर्व) मंडळ अध्यक्ष अनिष बाळकृष्ण जोशी (Anish Balkrishna Joshi ) हे याबाबतीत आघाडीवर आहेत. या महाभ्रष्ट व्यवसायिकाला आमदार मिहीर कोटेचा यांचाही आशीर्वाद लाभलेला आहे, कारण जोशी हे कोटेचा यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात, अशी माहिती ‘स्प्राऊट्स न्यूज’च्या सूत्रांच्या हाती आलेली आहे.

अनिष बाळकृष्ण जोशी हे शिवसेनेच्या (उबाठा ) गटाचे बाळकृष्ण जोशी यांचे चिरंजीव. बाळकृष्ण जोशी हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या मुलाने म्हणजेच अनिष यांनी मुलुंडमध्ये ‘दत्तात्रेय अनेक्स’ (Dattatray Annex in Mulund East, Mumbai) ही इमारत बांधली. या कमर्शिअल इमारतीमध्ये पार्किंची जागा आहे. त्यातील १ ला व २ रा माळा हा पार्किंगसाठी आहे. मात्र त्याचा वापर हा प्रदर्शन, पार्टीज व इतर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो, व त्यातूनही बिल्डर पैसे कमवतो. हे सर्व नियमबाह्य पद्धतीने होत आहे, त्यासाठी जोशी हे अग्निशामकदल विभाग, पालिकेचे बिल्डिंग विभागाचे अधिकारी यांच्याशी ‘अर्थ’पूर्ण संबंध ठेवून आहेत, असाही येथील रहिवाशांचा आरोप आहे.

अधिक वाचा : – अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये पार्किंग स्लॉट आहे. तेथे चुकीच्या बांधकामांमुळे पार्किंगची व्यवस्था होवू शकत नाही. वास्तविक ही जागा बिल्डर अनिष जोशी यांनी पालिकेला ‘पे अँड पार्क’साठी दिलेली आहे, मात्र त्याचा काडीमात्र उपयोग स्थानिक रहिवासी व नागरिकांना होवू शकत नाही.

विशेष म्हणजे बिल्डर अनिष बाळकृष्ण जोशी यांनी बेसमेंटचे बांधकाम हे निकृष्ट चुकीच्या पद्धतीने केलेले आहे. मात्र त्यांचे व पालिकेतील अधिकाऱ्यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या नियमबाह्य पद्धतीने बांधण्यात आलेल्या बांधकामाकडे पालिकेने सोयीस्कररीत्या डोळेझाक केलेली आढळते.

या बिल्डिंगमधील ज्या गाळेधारकांना गाळे दिलेले आहेत, त्यांना अद्यापही पार्किंगसाठी जागा मिळालेली नाही. त्यामुळे या बिल्डिंगमधील जवळपास ४० हून अधिक गाळेधारकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.

Exit mobile version