.• पराग शाह यांच्यामुळे भाजप व संघ परिवाराची बदनामी
उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
भाजपचे महाघोटाळेबाज बिल्डर पराग शाह यांच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याविषयी १७ नोव्हेंबरला ‘स्प्राऊट्स’मध्ये स्पेशल रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला, मात्र हा घोटाळा हे तर हिमनगाचे एक टोक आहे, अशी असंख्य प्रकरणे, महाघोटाळे अद्याप दडलेलीच आहेत. याविषयी असंख्य तक्रारी पीडित रहिवाशांनी संबंधित यंत्रणा व ‘स्प्राऊट्स’कडे केलेल्या आहेत, मात्र सरकार दरबारी शाह यांनी ही प्रकरणे ‘मॅनेज’ करण्यात आल्याची असंख्य उदाहरणे पुराव्यासह उघडकीस आलेली आहेत. या गैरव्यवहारांवर ‘स्प्राऊटस’चे संपादक उन्मेष गुजराथी यांनी लिहिलेला हा स्पेशल रिपोर्ट
भाजपचा घोटाळेबाज बिल्डर पराग शाह यांनी MAN INFRACONSTRUCTION LIMITED (MICL) या कंपनीच्या माध्यमातून असंख्य महाघोटाळे केलेले आहेत. या महाघोटाळ्यांमुळेच त्यांच्या संपत्तीत राक्षसी वाढ झाल्याचे आढळून येत आहे. २०१९ मध्ये पराग शाह यांनी त्यांची संपत्ती ५००.६२ कोटी असल्याचे जाहीर केली होते. परंतु, आता २०२४ मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात ३३०० कोटी एवढी प्रचंड संपत्ती दाखविली आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत पराग शाह यांची संपत्ती तब्बल ५७५ टक्क्यांनी म्हणजेच ६ ते ७ पटींनी वाढलेली असल्याचे आढळून येते.
पराग शाह यांनी केलेल्या महाघोटाळ्यांच्या असंख्य तक्रारी रहिवाशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच म्हाडा, एसआरए व इतरही संबंधित यंत्रणांकडे तक्रारी केलेल्या आहेत, मात्र अमित शाह यांच्या वरदहस्तामुळे कोणत्याही स्वरूपात कारवाई होत नाही, अशी स्प्राऊट्सच्या सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पराग शाह भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात महाघोटाळे करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या घोटाळ्यांपासून भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह त्यांना निश्चित संरक्षण देतीलही, मात्र नियतीच्या दरबारात क्षमा नाही. पराग शाह व त्याच्या कुटुंबियांना असंख्य रहिवाशांचे तळतळाट भोगावे लागतील, अशी प्रतिक्रियाही काही संतप्त रहिवाशांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना व्यक्त केली.
• काय आहे प्रकरण?
पराग किशोरचंद्र शाह हे घाटकोपर (पूर्व) येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. यापूर्वीही ते आमदार होते. मुंबईतील सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहेत. व्यवसायाने ते बिल्डर आहेत, मात्र ते घोटाळेबाजही आहेत. या घोटाळ्याविषयी ‘स्प्राऊट्स’ या मुंबईतील इंग्रजी न्यूजपेपरने ‘BJP’s Former MLA Involved in Massive FSI Scam Worth Thousands of Crores’ या हेडिंगखाली स्पेशल रिपोर्ट सादर केला.
रिपोर्ट प्रकाशित झाल्यावर ‘स्प्राऊट्स’च्या संपादक व स्टाफला घाटकोपर येथून मोठा प्रतिसाद मिळाला. शेकडो वाचकांनी या घोटाळेबाज बिल्डरचे पितळ उघडे केल्याबद्दल ‘स्प्राऊट्स’ व संपादक उन्मेष गुजराथी यांचे जाहीर आभार मानले व धाडसाचे कौतुकही केले.
.• शाह यांचे संस्कार
शाह यांनी ‘स्प्राऊट्समधील बातमी वाचल्यावर संपादक उन्मेष गुजराथी यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. त्यांना ‘मेंढक’ म्हणजेच बेडकाची उपमा दिली. मागील दोन वर्षांपूर्वी याच घोटाळेबाज बिल्डरने पत्रकारांना ‘HMV’ संबोधून त्यांना कुत्र्याची उपमा दिली होती. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यानंतर शाह यांनी शेपटी घातली व सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागितलेली होती.
अधिक वाचा : – भाजपच्या माजी आमदाराने केला हजारो कोटी रुपयांचा SFI महाघोटाळा
• उन्मेष गुजराथी यांच्या समाजावरही टीका
शाह यांनी या स्पेशल रिपोर्टसंदर्भात व्हिडिओही तयार केला आहे, त्यात विरोधकांना अशा प्राण्याच्या उपमा दिलेल्या आहेत, यावरून त्यांचे संस्कार समाजाला दिसून येतात. उन्मेष गुजराथी यांची जात ‘गुजराती’ आहे, यावरूनही त्यांनी टीका केलेली आहे.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना गुजराथी यांनी नमूद केले आहे की, मी आडनावाने व जातीने हिंदू – गुजराती आहे, त्याचा मला अभिमानच नाही तर गर्वही आहे. मात्र मी माझ्या व्यवसायाशी व भारतातील माझ्या वाचकांशी प्रामाणिक आहे, येथील जनतेवरील अन्यायाला वाचा फोडणे, हेच पत्रकाराचे काम आहे व ते ‘स्प्राऊट्स’ने केलेले आहे. याउलट शाह हे त्यांच्या बांधकाम व्यवसाय व ग्राहक यांच्याविषयी अप्राणिक आहेत. त्यांनी त्यांचा विश्वासघात केलेला आहे. त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे, त्यामुळे शाह यांच्यासारखी माणसे ही ‘गुजराती’ समाजाला कलंक आहेत.
शाह यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. असंख्य रहिवाशांचे तळतळाट त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना भोगावे लागणार आहेत, केवळ त्यांची पैशाची अफाट श्रीमंती पाहून त्यांना अमित शाह यांच्या आदेशावरून उमेदवारी देण्यात आलेली आहे, असा आरोपही पीडित रहिवाशांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ‘स्प्राऊट्स’शी केला आहे.
• आयत्या बिळावर नागोबा
या मतदारसंघातून सलग ६ वेळेला निवडून आलेले माजी आमदार प्रकाश मेहता यांनी हा मतदारसंघ बांधलेला आहे, भाजपची ताकद निर्माण केली, या बळावरच पराग शाह यांच्यासारखे घोटाळेबाज बिल्डर २०१९ साली निवडून आले. भाजप वगळता ते अन्य कोणत्याही पक्षातून निवडणुकीला उभे राहिले असते तर त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले असते, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे माझ्या ‘गुजराती’ समाजाची व संघ परिवाराची प्रतिमा मलीन झाली आहे, याचे मला वाईट वाटते, अशी प्रतिक्रियाही ‘स्प्राऊट्स’च्या संपादकांनी व्यक्त केली.
घोटाळेबाज पराग शाह यांनी स्प्राऊट्सच्या संपादकांना धमकी दिलेली आहे, मात्र अशा धमक्यांना ‘स्प्राऊट्स’ची टीम घाबरणार नाही. याउलट ‘स्प्राऊट्स’च्या संपादकांना धमकी दिल्याबद्दल व व्हिडीओ काढून त्यांची बदनामी केल्याबद्दल संपादक हे पराग शाह यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, अशी माहितीही उन्मेष गुजराथी यांनी दिलेली आहे.
• संपादकांच्या जीवाला धोका
‘स्प्राऊट्स’चे संपादक उन्मेष गुजराथी, स्टाफ व त्यांचे कुटुंबीय यांना पराग शाह हे खोट्या केसेसमध्ये गुंतवण्याची शक्यता आहे, त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, त्यांच्या जीविताचे बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी ही घोटाळेबाज बिल्डर पराग शाह यांची असेल, अशी माहितीही ‘स्प्राऊट्स’तर्फे संपादकांनी व्यक्त केलेली आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी शाह यांना संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.