उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स न्यूज Exclusive
मुंबईतील विलेपार्ले येथे जैन धर्मियांचे पार्श्वनाथाचे मंदिर होते. हे मंदिर सुमारे ९० वर्षे जुने होते. मात्र चंद्रशेखर नावाच्या हॉटेलमालकाने मुंबई महानगर पालिकेकडे तक्रार केली, पालिकेच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक संबंध जोपासले. आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांकरवी हे मंदिर जमीनदोस्त केले.
भांडुपमध्येही याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. पालिकेने १५ ते २० वर्षे जुन्या चर्चला त्यांचे जवळपास १००० स्क्वेअर फुटांहून अधिक बांधकाम तोडण्याची नोटीस दिली आहे. Methodist Tamil Church या नावाचे हे चर्च आहे. विशेष म्हणजे हे चर्च खासगी आहे व त्याचे कामही संपूर्णपणे अधिकृत आहे. याच चर्चजवळ छोटेखानी मंदिर आहे, तेही पालिकेकडून उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. याशिवाय ६ कंपन्या, ‘महावितरण’ व असंख्य अधिकृत घरांची कंपाऊंड्स तर काही घरेही तोडण्यात येणार आहेत, तशा नोटिसाही या सर्वांना बजावण्यात आलेल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
भांडुपच्या पश्चिमेकडे पोलीस स्टेशन आहे. या रस्त्याच्या जवळ आत्माराम भोईर मार्ग आहे. या मार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव मुंबई महानगर पालिकेने मंजूर केलेला आहे. स्थानिक रहिवाशी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजीवकुमार सदानंद यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला मिळालेल्या (SIT) माहितीनुसार या मार्गावर भांडुपमधील बिल्डरच्या ३ ते ४ टॉवरचे काम चालू आहे. या बिल्डरच्या टॉवरची आर्थिक व्हॅल्यू वाढावी व त्यातून अधिक आर्थिक फायदा मिळावा, या उद्देशाने या बिल्डरने महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपये दिले व त्यानुसार तात्काळ या रस्त्याच्या रुंदीकरणाला मान्यता मिळाली, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी ‘स्प्राऊट्स न्यूज’शी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
अधिक वाचा : Jain Temple Razed
पालिकेविरोधात न्यायालयात रिट पिटिशन दाखल:
बिल्डरच्या फायद्यासाठी पालिकेचे अधिकारी ही बुलडोझर कारवाई करण्यासाठी सज्ज आहेत. तशा नोटीसाही त्यांनी जवळपास शेकडो स्थानिक रहिवाशांना बजावलेल्या आहेत. काही रहिवाशांनी मात्र पालिकेच्या या कामालाच आव्हान दिलेले आहेत. तशा केसेसही (writ petition) त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहेत. मात्र बिल्डरच्या ताटाखालचे मांजर झालेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम तात्काळ जमीनदोस्त करण्याचे ठरविले आहे, त्यानुसार न्यायालयाच्या सुनावणी होण्याअगोदरच हे चर्च व बाजूचे मंदिर व बाधित घरे पडली जाण्याची भीती, स्थानिक रहिवाशांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्प्राऊटशी बोलताना व्यक्त केली.
याबाबत प्रतिक्रियेसाठी पालिकेच्या एस वॉर्डच्या इन्चार्ज कल्पना कोतवाल यांना वारंवार संपर्क साधला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.